हुंड्याचा धंदा

👰🏻 *हुंड्याचा धंदा*💸

वयात येताच पोरगा जरा
धंदा जोरात चालू होतो
किती घ्यायचा हुंडा हा
हिशोब घरादारात चालतो

घरदारासह हा पट्ट्या
पोरगी बघायला जातो
कांदापोहे चालेल कशी
पुरणपोळी खाऊन येतो

बैठक बसवून लोकांची
इथं लावली जाते बोली
बापाला मग प्रश्न पडतो
का जन्माला येतात मुली

हुंड्याचा रेट प्रत्येकाचा
वेगळा ठरलेला असतो
लाख दीड लाखात कोणी
तोळ्यात विकला जातो

एक दोन हजारामुळेही
शुभकार्यात येते विघ्न
अशी पैसेपिपासु लोकं 
मोडून टाकत्याती लग्न

चिमण्या पोरीसाठी बाप
देणं सगळ करतो कबूल
दिवट्या पोराच्या अंगावर
मग चढवली जाते झुल

मातीमोल ठरतात नाती
कवडीमोल कागदासाठी
कशा जन्मा येतील पोरी
अशाने समाज्याच्यापोटी?

तुझ्या पोटी जन्मेल मुलगी
तेव्हाच सारं तुला कळेल
बोली लागताना तेव्हा तुझं
काळीज तीळ तीळ जळेल

आता तरी वाटुदे जरा खंत
अजूनही वेळ गेलेली नाही
मुलीचे बाप मागतील हुंडा
तो दिवस  खरेच दूर नाही

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

No comments: