*वंचित*
सत्तरी ओलंढली स्वातंत्र्याने
तरीही बत्तर आमचे जीणे
कपडेही अजून फाटलेले
देश विकसित होतोय म्हणे
डांबराचा टिपका अजूनही
शिवलेला नाही या रस्त्याला
अजूनही इथं पेटतो दिवा
विजेचा पत्ता नाही वस्तीला
नुसती कोटींची आश्वासने
हवेमध्येच हरवले जातात
मदतीच्या पॕकेजसाठी फक्त
कागदी घोडे मिरवले जातात
स्वातंत्र्य मिळवलेला माझा देश
इंडीया भारतात विभागला आहे
इंडीया शहरात चमचमतो आहे
भारत अन्नासाठी महागला आहे
पोटासाठी वणवण आमची
कधीतरी संपायलाच हवी
शहर नको तुमचे आम्हाला
विकासात तुमची साथ हवी
✒ *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*
No comments:
Post a Comment