करावासा वाटतो अंत

करावासा वाटतोय अंत

करावासा वाटतोय अंत
कुजलेल्या विचारांचा
एकविसाव्या शतकातही
अंधश्रद्धा पाळणाऱ्यांचा

करावासा वाटतोय अंत
वासनांध झालेल्यांचा
बलत्कारासाठी उठणा-या
कामवासनी देहांचा

करावासा वाटतोय अंत
तरूणींवर शेरेबाजी करणाऱ्यांचा
आधुनिक बदल न स्विकारता
कपड्यावरून गरळ ओकणाऱ्यांचा

करावासा वाटतोय अंत
कळीला गर्भात खुडणा-यांचा
स्रीजातीवर हात उगरणा-या
बिनलाज्या पुरूषी अहंकाराचा

करावासा वाटतोय अंत
जातीत भेदभाव करणाऱ्यांचा
स्वतःच्या स्वार्थापायी
एकमेकांत भांडणे लावणाऱ्यांचा

करावासा वाटतोय अंत
दुबळ्यांवर अन्याय करणाऱ्यांचा
अन् अंत करावासा वाटतोय
मुकाटयाने अन्याय सहनाऱ्यांचाही

करावासा वाटतोय अंत
मनुस्मृतीने पाडलेल्या अंधाराचा
धर्मविरोधी मनात घाण साठवून
समाज कुरतडणाऱ्या उंदरांचा

करावासा वाटतोय अंत
माझ्या आणि तुमच्यासारख्यांचा
सगळंकाही दिसत असूनसुद्धा
धृतराष्ट्र बनू पाहणाऱ्या वृतींचा

No comments: