चला शोधूया

आम्ही थंड
तुम्ही थंड
कोण थांबवेल हे
मानवते विरूद्धचे बंड

आम्ही शांत
तुम्ही शांत
दृष्ट प्रवृतीचा
कोण करेल अंत

तुम्ही शंड
आम्ही शंड
म्हणून जातीयवादी
वाढलेत गुंड

आम्ही दुःखी
तुम्ही दुःखी
कशी होईल
जनता सुखी

आम्ही राजे
तुम्ही राजे
विकास शुन्य
नुसते तोंड गर्जे

आम्ही कवी
तुम्ही कवी
चला शोधूया
यावर युक्ती नवी

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

तो नभीचा ध्रुवतारा

*तो नभीचा ध्रुवतारा* 🌟

ढळला जातो गिरीराजही
कधी हिमस्सखलन होऊन
कधी केदारनाथ तर कधी
माळीणला पोटात गाडून

महावृक्षही पोखरला जातो
वाळव्यांच्या अक्रमणाने
तर कधी दिला जातो बळी
अवास्तव विकास नावाने

भलेभलेही गाडले गेलेत
जग मुठीत धरू पाहणारे
अजिंक्य बिरूदावलीवाले
भौतिकतेवर गर्व करणारे

उठतात मनाच्या पटलावर
ते कैक तरंग अनिश्चितेने
दृढनिश्चयही ढळला जातो
मेनकेच्या एका दर्शनाने

विश्वासही नाही राहिला
आता अभेद्य, चिरंतन
पेव अफवांचे फुटताच
आत कातरले जाते मन

पावसावरही नाही भरवसा
बेईमान होतोय तो वारा
अढळ,निश्चल,श्वाश्वत फक्त
एकच तो नभीचा ध्रुवतारा

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

होय माझा देश

*होय माझा देश महासत्ता बनू लागलाय*

होय माझा देश महासत्ता बनू लागलाय!

पहिल्यासारखा आता शेतकरी दीनवानी
देवाला दोष देत बसत नाही
आत्महत्या करण्यापेक्षा या सरकारला
सळो की पळो करून सोडू लागलाय

बेरोजगारीचे कारण नशीबाला आता
कोणताच तरूण मानत नाही
विविध कौशल्यात निपून होतोय तो
किंवा स्वतःच उद्योग उभारू लागलाय

दास्यत्वाची वल्कले स्त्रीयांनी केव्हाच
गाडून टाकल्यात काळाच्या मातीत
अन्यायाविरूद्ध पेटून उटत्यात आणि
आत्मविश्वासही मनात जोर धरू लागलाय

पाप-पुण्य या भाकडकथेत कोणी रमत नाही
कर्मकांडालाही सहसा जुमानत नाही कोणी
विज्ञानाचा वसा सर्वांनीच अंगीकारलाय
चंद्रावर पाय ठेवून मंगळाला पाहू लागलाय

जाती-पातीची बंधने केव्हाच झुगारलेत
खांद्याला खांदा लावून झटतोय प्रत्येकजन
समानतेचा वसा आता प्रत्येकानेच घेतलाय
सविंधानाचे नियम जो तो पाळू लागलाय

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

अंधकार पसरतोय

*अंधकार पसरतोय*

संपतोय तो प्रकाश
अंधारतेय ती वाट
सोनेरी किरणांची
हरवतेय ती पहाट

दूरावली सारी नाती
सुटले हातातले हात
आपल्या मतलबाने
केला आपलाच घात

झाडांच्या नरडीवरती
आम्हीच ठेवली कुर्हाड
चिऊकाऊचं सुखातलं
हाकलून दिलं बिर्हाड

चॕटिंग करण्यासाठी
संवादच केलाय बंद
संकुचित प्रवृत्तीमध्ये
झाले सारे नजरबंद

वंशाच्या दिव्यासाठी
वातीलाच विसरतोय
म्हणून तर घराघरात
हा अंधकार पसरतोय

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

प्रेमवेडा

🌹 *प्रेमवेडा*🌹

माझ्या गुलाबी प्रश्नांना
नकोय ग काटेरी उत्तर
सौंदर्यासह तुझ्या सखे
पसरू दे सुगंधी अत्तर

तुझ्या मुलायम केसात
माळावा वाटतो गजरा
का दडवतेस पदरात तु
मुखडा तुझा तो लाजरा

ओठ सखे तुझे जणू की
गुलाबाच्या  पाकळ्या
हसतेस जेव्हा गाली तु
उमलतात जशा कळ्या

पैंजणाची ती रूणझुण
ह्रुदयाची छेडते तार
कातिल मृगनयनांनी तव
होतात माझ्यावर वार

समजावे मी तरी किती
हा जीव गुंतला तुझ्यात
विसरून तुलाच तुही
मिसळून जावे माझ्यात

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
© *ldsawant.blogspot.in*

नजर मायेची

*नजर मायेची*

झेप आकाशी घेतली
चित्त बाळापाशी होते
तिच्या भविष्यासाठीच
बळ पंखामध्ये येते

आहे शर्यत जीवाची
दंग धावण्यात जो तो
माय घेते धाव परी
जीव लेकीत गुंततो

राणी झाशीची लढली
पुञ पाठीशी बांधून
माता जपते पुञांना
राञं - दिवस रांधून

उर्मी एकच मनाला
ध्येय गाठायचे आता
धावताना हरीणीला
जशी पाडसाची चिंता

तिची नजर मायेची
दूर हटेना थोडीही
जीवा इवल्या सोडून
जावू वाटेना पुढेही

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

आला उन्हाळा

🔥 *आला उन्हाळा*🍂

धारा घामाच्या घेवून
आलाय हा उन्हाळा
सोसवेना कोणालाही
गरम हवेच्या झळा

तळ गाठलेली विहीर
ओस पडलेला गाव
चहूदिशा पाण्यासाठी
बायापोरं घेती धाव

भेगाळलेली जमीन
हळदीजर्द बाबूळ
ओझंटलेले वाहणारे
नभात शुभ्र ढगूळ

जागोजाग पाणपोई
गार कुल्फीचे ठेले
गावोगावी गावकरी
ग्रामयाञेत रंगलेले

थंड ठेवा तुम्ही शरीरा
नि ठेवा मनालाही थंड
उन्हासह झेलायच्यात
झळा महागाईच्या प्रचंड

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

पुन्हा येवो रामराज्य

रामा तुझ्या राज्यामधे
आद्भुत लागलय घडू
रामच गेला जीवनातील
अनुभव येतायत कडू

मर्यादा आपल्यासम इथं
कोणीच पाळत नाही
कितपत चालवावी जीभ
काहींना हेही कळत नाही

परस्री मातेसमान मानणे
आता सारेच विसरलेत
तिची आब्रु लुटण्याईतपत
कित्येक नराधम घसरलेत

सुखी प्रजेची संकल्पना
केव्हाच झालीय नष्ट
अन्यायाचे झेलत घाव
अजूनही सोसतेय कष्ट

भावा-भावामधून आता
विस्तवही जात नाही
माणुस नावाची जात
आता दिसूनच येत नाही

कोणतीच सासू सुनेला
अजूनही मानत नाही लेक
संयम नाही कोणाकडेच
उडतो संतापाचा उद्रेक

पुन्हा येवो श्रीराम राज्य
हीच मनाला अभिलाषा
नाहीतर कटकारस्थानाने
काळवंडून जातील दिशा

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

माझ्या शाळेत चल माझ्या दोस्ता


माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता गीताच्या चालीला अनुसरून

माझ्या शाळेत चल माझ्या दोस्ता

चिखला-पाण्याचा तुडवीत रस्ता
माझ्या शाळेत चल माझा दोस्ता

बा मातीचे मातीचे करतोय सोनं
शिक्षण घेवून त्याची वाढवू शान
प्रगत होऊन उंचावू त्याची मान
आणिक किती खाईल तो खस्ता

बघ गणित गणित झालय सोप
जसा शंकु शंकु जोकराचा टोप
कशाला धरायचा शेताचा रस्ता
माझ्या शाळेत चल माझ्या दोस्ता

घेवूया शिक्षण शिक्षण जावूया पुढे
डिजीटल तंञाने तंञाने शिकू धडे
अज्ञानाने लागेल जीवा घोर नस्ता
माझ्या शाळेत चल माझ्या दोस्ता

या देशाचे आहोत आपण भविष्य
ज्ञान घेवूनीया होऊ गुणवंत शिष्य
नाहीच कठीण हा प्रगतीचा रस्ता
माझ्या शाळेत चल माझ्या दोस्ता

✍🏻 लक्ष्मण दशरथ सावंत
जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद
© ldsawant.blogspot.in

जगण्याचे बळ

*जगण्याचे बळ*

सोसवेना आता या
तिव्र उन्हाची झळ
विहिरींनीही केव्हाच
गाठलाय तो तळ

पर्ण झडून वृक्षवेली
बोडक्या झाल्यात
पाण्याविना पडल्या
धरतीलाही भेगळ

पाणवटे केव्हाचेच
पडलेत सारे ओस
प्राणी सैरावैरा झाले
शोधताना मृगजळ

सुकल्यात पापण्याही
सुकताना पिके मोती
जखम काळजामध्ये
कसे दाखवणार वळ

आस  कर्जमाफीची
या  मनाला  लागलीय
तरी  मायबाप सरकार
अजूनही काढतय पळ

इडापिडा टळू दे सारी
येवो दे  बळीचे राज्य
आत्महत्येविना येऊ दे
त्याला जगण्याचे बळ

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

आयुष्य

*आयुष्य*

तु असताना संग
मज भय ते कसले
दाटता डोळा पाणी
होते अलगद पुसले

काट्याची चिंता ती
मी करावी कशाला
आयुष्य हे  मजला
रेशमासम  भासले

कुणाची पर्वा सांग
कशाला ह्या जीवा
तुझेच नाव माझ्या
ह्रुदायामधी वसले

तु माझ्यासाठी आहे
नित्य जीव की प्राण
चिखलात सांग कधी
फूल कमलाचे नासले

आयुष्य आहे माझे
अमानत ही तुझी
तुझ्यातच माझे मज
आज भविष्य दिसले

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

सोसाव्या कशा झळा?

*सोसाव्या कशा झळा*

आश्वासने दिलीत आता शब्द तुम्ही पाळा
शेतकऱ्यांचा जीव घेणे आता तुम्ही टाळा

लपंडाव विजेचा हंगामातच सुरू झालाय
महावितरण ऐनवेळी झाकून घेतेय डोळा

तोंडातला घास कोणी काढून जसा घ्यावा
डोळ्यादेखत करपतोय दुष्काळात मळा

हिरवी काडीही आता शेतात उरली नाही
चार्याविना बैलांचा दिसू लागलाय सापळा

उरले-सुरले शेतातले गारपिटीने सडवले
कर्ज फेडणार कसं पोटात उठतोय गोळा

कर्ज माफी नाही अनुदानही झाल तोकडं
उन्हापेक्षा भयंकर या सोसाव्या कशा झळा

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

संशय

*संशय*

संशायाने तिच्या गळा लावला फास होता
त्यानेच हाताने त्याचा केलेला नाश होता

कमवता तो, कमवती होती तीही चार पैसे
नरजातीच्या अहंकाराचा तिला ञास होता

चार शब्द प्रेमाचे नव्हते ऐकण्यात मिळाले
भरल्या संसारातही मिळाला वनवास होता

संशायाने जाळले जित्यापणीच तीला त्याने
स्त्री-पुरूष समानतेचा नियम बकवास होता

अशाने कशी करावी तिने वटवृक्षाची पुजा
अंधाराकडे चाललेला तो तिचा प्रवास होता

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

गुढीपाडवा

प्रासंगिक उपक्रम -गुढीपाडवा*

नविन किरण| नविन पहाट|
नाविन्याची लाट| चरोचरी||

चैञ महिन्यात| नविन हे वर्ष|
मनामध्ये हर्ष | दिसतसे||

उभारली दारी| आनंदाची गुढी|
बोलण्यात गोडी| वाढतसे||

माळुनी गजरा| नेसुनिया साडी|
उभा राहे गुढी| आसमंती||

चंदनाची काठी| सोन्याचा तो करा|
कडूलिंब तुरा| शोभतसे||

मराठी अस्मिता| करूया जतन|
होईल पतन| दुरीताचे||

तेजोमयी होवो| जीवन प्रवास|
हिच मनी आस| आमुचिया||

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

शेतीच्या बांधावरून

*शेतीच्या बांधावरून*

माय बाप सरकार तुम्ही म्हणून तुम्हाला सांगणं
पटत नाही मनाला तुमचं आजकालच हे वागणं

पोशींदा जगाचा म्हणून गौरविता आम्हा नित्य
नुसत्याच घोषणांचा बाजार ते शब्द ना पाळणं

हातातोंडाला येतो घास कसाबसा शेतात अन्
भरताना पाणी पिकाला विजेचे अचानक जाणं

कर्ज काढून जपलं जातं त्या कांद्याच्या रोपाला
नेहमीच लिहिलेलयं कांद्याच्या भावाने रडवणं

वाचतात पिकं कधीतरी आसमानी संकटातून
शेतमालाच्या दराला नेहमीच खाली पाडणं

विरोधक करतायत म्हणे कर्जमाफीची ती थट्टा
तुमची तरी कुठं आहेत सांगा शेतीपुरक धोरणं

पटत नाही मनाला तुमचं आजकालचं हे वागणं
मातीतुन फक्त आमचं आहे तुम्हा एकच सांगणं

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

हर्ष या जीवनामधी

थोड्या कारणाने भांडण झाल्यावर माहेरी गेलेल्या पत्नीला समजण्यासाठी पतीने केलेली याचना👇🏻😊😊🌹💐

*हर्ष या जिवनामधी*

संदेश या ह्रुदयाचा
त्या ह्रुदयाला कळावा
हर्ष या जीवनामधी
सुगंधापरी दरवळावा||धृ||

इवल्याशा रुसव्याने
तु सोडलेस हे घरटे
तुझ्या प्रेमाविना ते
गुलाब राहीलेय खुरटे
आता तरी तुझा रस्ता
या घरट्याकडे वळावा||१||

सोसवेना मज आता
हा वसंताचा ऊनवारा
तुझ्या आठवात नित्य
नयन पाझरती धारा
दूरावा आपल्यातील हा
या उन्हामधी जळावा||२||

मांडू नव्याने तो डाव
तु ये ग परतून वेगे
फुलेल संसारवेल पुन्हा
मिळून राहूया दोघे
अबोला दोघातील तो
दूर नभामधी पळावा||३||

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

क्रांती पेटवली मनी

*क्रांती पेटवलि मनी*

असे पेटून उठले पाणी
नवी क्रांती पेटवली मनी
आक्रमीले जल प्राशुनी
बंध गुलामीचे झुगारूनी||धृ||

तोडले ते पाश बंधनाचे
मनुवृत्तीच्या जोखडांचे
बिज रोविले मानवतेचे
गर्व हरविले अहंकाराचे
असा कानमंञ दिधला कानी||१||

दूर लोटून त्या परंपरेला
जागविले स्वाभिमानाला
अंगीकारीले मानवतेला
जाळीले स्वार्थी वृत्तीला
ऐकूनी ती आर्त विराणी||२||

शमवली स्वतंत्र्याची तहान
लिहिले ते दिव्य संविदान
मिळाला जगामधी सन्मान
असा नाही कोणी विद्वान
आम्ही सदैव तुमचे ऋणी||३||

लढण्याचे बळ तू दिधले
भय केव्हाच दूर पळाले
आत्मसन्मानी मन झाले
असमानतेचे फोडून अश्म
दिधले स्वातंत्र्याचे पाणी||४||

✍🏻 लक्ष्मण दशरथ सावंत
जि.प.कें प्रा.शा.पाल,औरंगाबाद
९४०३६८२१२५

गणनन पुर्वतयारी बालगीत

👬 *गणन पुर्वतयारी*👬

चल मिञा आपण दोघे शाळेमध्ये जाऊ
शिकताना छान छान गाणी आपण गाऊ

एक पाटी एक पेन्सिल काढूया एक कोन
एकात एक मिळवल्यावर उत्तर मिळे दोन

तीन पाते ती पंख्याची बघा हवा देती गार
दुध देते गाय आपल्याला तिचे पाय चार

हाताची बोट पाच आहेत मोजून जरा पहा
मोजलेत का मुंगीचे पाय आहेत बरं ते सहा

सात रंगाच्या इंद्रधनुचा पाहूयात थाटमाट
सातामध्ये एक मिळवता उत्तर येईल आठ

नऊ काढताना एकला पलटून जरा पहा
दोन्ही हातांची बोटे एकूण आसतात दहा

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

कविता व कवी

कविता मनात
कविता ध्यानात
ह्रुदयाच्या आत
       कविताच||१||

कविता भावना
कविता कल्पना
फुलविते मना
         कविताच||२||

कविता बोलते
कविता चालते
राज ही खोलते
        कविताच||३||

कविता हा श्वास
कविता विश्वास
अखंड प्रवास
         कविताच||४||

कविची ती आण
कविचा ती प्राण
कविचा सन्मान
          कविताच||५||

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

चिऊताई फक्त दिन

🐥 *चिऊताई फक्त दिन*😥

पहिले कसं लेकरावाणी
चिऊताई अंगणी दिसायची
त्यांची गाणी गात लेकरं
अगदी मनमोकळी हसायची

घरोघरी अन् झाडोझाडी
चिमणीखोपा असायचा
प्रभातवेळी चिवचिवाटानं
हा जीव जागा व्हायचा

मायेच्या हातून पसाभर
धान्य परसात सांडायचे
वेचताना चिऊ नि काऊ
दोघं आपसात भांडायचे

घरात किती सुबत्ता आहे
चिऊचा वावर सांगायचा
घरातल्या जिव्हाळ्याचा
लगेच अंदाज लागायचा

पहिले तो सुर्य फक्त
पुर्वेकडेच उगवायचा
जो भाव असे मनामंधी
तो कर्तव्यात दिसायचा

मनाप्रमाणेच आता लोक
सुर्याला उगवायला सांगती
दुसऱ्यांची चिंता कुठं इथं
स्वपोटापुरतच ते मागती

लहानपणी दिसलेली चिऊ
फक्त पुस्तकापुरती उरली
सर्वसमावेशक संस्कृती आमची
आम्हीच मातीत पुरली

आता जे होऊ लागले नष्ट
त्यांचा दिन साजरा होतोय
मोठमोठ्या घोषणा फक्त
कृती कोण सांगा करतोय

चिऊकाऊसारखं एक दिस
नष्ट होऊन जाऊ आम्ही
कोणी शिल्लक राहणार नाही
राहील वळवळणारी कृमी

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*