ठेच मायेच्या पायाला

ठेच मायेच्या पायाला
असू डोळ्यात दाटते
जवा रक्ताळतो पाय
माझे काळीज फाटते

रक्ताळला पाय तिचा
नाही दगडा पाझर
भाळी लिहिली ठोकर
किती जपावी नजर

ठेच लागता पायाला
किती तळमळे जीव
किती निष्ठूर तो देव
नाही येत त्यास कीव

नित्य चालणे उन्हात
असे दुर्मिळ सावली
रस्ता दगड- मातीचा
नित्य तुडवी माऊली

नाही साडी भरजरी
तरी कणखर पाय
लाख दगड धोड्यांना
उरे पुरुनिया माय

✍🏻 लक्ष्मण दशरथ सावंत
जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद
© ldsawant.blogspot.in

आठवण तुझी येते

*आठवण तुझी येते*

आठवण तुझी येते
तेव्हा काळीज फाटते
दुराव्याचे शल्य माझ्या
सखे उरात दाटते

आठवण तुझी येते
नभी दिसता चांदणं
आठवते तुझ्या सखे
भाळी केलेलं गोंदणं

आठवण तुझी येते
फूल गुलाबी पाहून
वाटे घालावासा पिंगा
आता भ्रमर होऊन

आठवण तुझी येते
थेंब लागताच पडू
आसू जातात भिजून
याला का म्हणावे रडू?

आठवण तुझी येते
दिसताच मयखाना
दोन घोट  पिण्यासाठी
मग मिळतो बहाणा

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
© *ldsawant.blogspot.in*

निरोप तुला देताना

*निरोप तुला देताना*

एक वर्षाची संगत
अनुभव देवून गेली
ज्ञान अमृताची द्वारे
सगळीच होती खुली

निरोप तुला देताना
भारावलोय मी मनी
आनंद नव वर्षाचा
तरी आसू या नयनी

झाले गेले सारे असे
कसे विसरून जावे?
नवे येते वर्ष म्हणून
कसे कृतघ्न मी व्हावे?

सुटताना हात जशा
वेदना ह्रुदयाला होतात
मनामधी गत वर्षाच्या
मग आठवणी दाटतात

वाडवडील सांगायचे
जुने ते सोने असते
मागे वळून पाहताना
तेच खरोखर भासते

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

कप

☕ *कप*☕

कप मारत असतात उड्या
या टेबलावरून त्या टेबलावर
याच्या तोंडी लागत असतात
कधी त्याच्या तोंडी लागत आसतात
परत विसळले जातात
कधी गडूळ झालेल्या पाण्यात
अन् नंतर स्वच्छ
कधी भिडत असतात आपसातच
चहा ओतून घ्यायला
किटलीतून तर कधी पातेल्यातून
गाळणीतून गाळलेला
काही फुटतही असतात, हातातून निसटून
अगदी टुकड्या-टुकड्यात
आवाज दिवसभर चालू असतो
संध्याकाळच्या वेळेला मात्र
फेकले जाणार असतात,
कान तुटलेले,निरोपयोगी झालेले
तर बरेचसे मांडणीला
लटकवले जाणार असतात,
काही पालथे घातले जातात 
उद्या परत चहा ओतण्यासाठी
तोंडाला लावण्यासाठी

✒ *लक्ष्मण दशरथ सावंत*
© *ldsawant.blogspot.in*

विझता विझेना

*विझता विझेना*
*षढाक्षरी*

धुपणच जणू
झालंय जातीचं
जळता जळेना
विझता विझेना

शिगेला पोचली
महगाई आता
गरीबाची रोटी
भाजता भाजेना

पाण्याविना धरा
सुकूनिया गेली
माती पावसाने
भिजता भिजेना

पाश्चात्त्य संस्कृती
मनामनामंधी
नवी नवरीही
लाजता लाजेना

सोशल होण्याचं
फॕड आलं हल्ली
रात्रभर कोणी
निजता निजेना

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
© *ldsawant.blogspot.in*

आम्ही भारतीय

*आम्ही भारतीय*

कटू अनुभव सारे
आम्ही विसरून जातो
एकमेका तिळगूळ
आम्ही भरवून येतो

ध्येय एकच आमुचे
एक आमुचे विचार
सौहार्दाने नांदायचे
आम्ही गिरवून घेतो

विभागलो जरी आम्ही
नाना जातीपातीमधी
जास्त ताणायचं नाही
आम्ही ठरवून घेतो

सारे भांडलो कितीही
तरी एकत्र नांदतो
वेळ पडता, वैऱ्यांची
आम्ही जिरवून येतो

रंग कुणाचा हिरवा
रंग कुणाचा भगवा
रंग तिरंग्यात येता
सारे हरवून जातो

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

रंग आयुष्याचे

*रंग आयुष्याचे*🌈

मनसोक्त हसलो मी
कधी हसवीत आलो
रंग आयुष्याचे कधी
असे उधळीत आलो

कधी वादळाला भ्यालो
कधी वादळाला प्यालो
आग वादळाची कधी
इथं शमवीत आलो

कधी सुखात न्हाहलो
कधी दुःखात वाहलो
कधी प्रेम देत गेलो
कधी मिळवीत आलो

तृणावर चमकाया
कधी दंवबिंदू झालो
ठसे अस्तित्वाचे कधी
इथे उमटीत आलो

कृतुत्वाला डोईवर
कधी मिरवीत आलो
अन्यायाला पायदळी
नित्य तुडवीत आलो

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

माझा शिवा

🚩 *माझा शिवा* 🚩

माणसाला माणूस शिवा जोडत गेला
अन्याय मुघलांचा शिवा तोडत गेला

काळवंढली होती रयत जुलमाने
मंत्र स्वराज्याचा शिवा सोडत गेला

माजलेले होते लांडगे मराठी मातीत
शत्रू अफजल्यांना शिवा फाडत गेला

गनिमी कावा कधी निधड्या छातीने
वर्चस्व गनिमांचे शिवा मोडत गेला

उभारल्यात भिंती जरी गडदुर्गांच्या
भिंती जातीधर्माच्या शिवा पाडत गेला

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

माझी माय मराठी

माझी माय मराठी

माझी माय हो मराठी
किती वर्णवू महती
साता-समुद्रा पल्याड
तिची पसरली किर्ती

गोडी अविट भासते
ओवी मुखामधी येता
ज्ञानयाचे तुकोबाचे
कान अभंग ऐकता

पैठणीची भरजरी
माय परिधान करी
साज कोल्हापूरी तिच्या
दिसे छान अंगावरी

कृष्णा कोयना नि गोदा
तिच्या लाडाच्या ग लेकी
पाणी पिऊन जनांच्या
भिने अंगामध्ये एकी

अमृताचा रे गोडवा
मज बोलताना वाटे
तिच्या अमृत वाणीने
तम अज्ञानाचे मिटे

किती तिच्या बोलीभाषा
कोल्हापूरी अहिराणी
विदर्भाची ती व-हाडी
कोकणाची ती कोकणी

नाना जाती नाना धर्म
तिच्या उदरी नांदती
तिच्या परोपकाराचे
नित्य गोडवे वदती

लक्ष्मण दशरथ सावंत
पाल,औरंगाबाद
9403682125

रंग रंगले रंगात

🎨 *रंग रंगले रंगात*🎨

रंग उजळून आले
रंग खुलवून आले
रंग कळींना देवून
रंग फूलवून आले

रंगवाया निसर्गाला
रंग वसंताचे आले
रंग झाडांना वेलींना
रंगमय सारे झाले

रंग गालाला लावूया
रंग अंगाला लावूया
रंग लावू  एकमेकां
रंग   रंगीत  होवूया

रंग येता हातामधी
रंग चेहऱ्याला आले
रंग कोणता कोणाचा?
रंग सारे एक झाले

रंग लागले तनाला
रंग लागले मनाला
रंगमय  वसंताचे
रंग लावूया जनाला

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

कोण गडे?

असतेस सदा तू
माझ्या आसपास
जगू कसा तुजवीन
तुच माझा श्वास

तुजवीन खरेतर इथं
पानही हालत नाही
फुल गुलाबाचं जरी
आनंदे डोलत नाही

जाळतेच तूच आणि
विझवणारीही तूच
दम कोंडतो तुझमुळे
गंध पसरवणारी तूच

जलचक्र हे तुझ्यामुळे
तूच वादळे वाहणारी
भरती-ओहटी तवकारणे
तू त्सुनामी घडवणारी

कोण बरे तू आहे गडे
मज हवीशी वाटणारी?
ह्रुदयासह माझ्यातल्या
रक्तातही घर थाटणारी?

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

महादेव

☘पावन महाशिवरात्रीनिमित्त प्रभू महादेवाच्या नावांची षठाक्षरी रचना ☘

शिव महाकाल
शिव महाकांत
शिव एकपाद
शिव उमाकांत

शिव निरंजन
शिव निलकंठ
शिव अनिरूद्ध
शिव कालकंठ

शिव अर्धेश्वर
शिव योगेश्वर
शिव सर्वेश्वर
शिव महेश्वर

शिव उमानाथ
शिव सिद्धनाथ
शिव गणनाथ
शिव भोलानाथ

शिव कल्पवृक्ष
शिव ही एकाक्ष
शिव महालिंग
शिव पिंगलाक्ष

शिव अक्षमाली
शिव अंबरीश
शिव त्रिलोकेश
शिव जगदिश

शिव  पुरंदर
शिव जटाधर
शिव कलाधर
शिव गंगाधर

☘ *हरहर महादेव* ☘

✍🏻  *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

पळस फुलला

*पळस फुलला*

येतो पळसाला पहा
सर्वअंगा रक्तवर्ण
माह संपताना माघ
जाती झडूनीया पर्ण

पोपटाच्या चोचीसम
याची सुंदरशी फुले
जणू फडके पताका
तशी वाऱ्यावर डुले

लाल दिसताती ज्वाला
जणू शेकोटी पेटली
मिळवाया ते तारूण्य
धरा   पेटून   उठली

मातकट, मळसर
जरी निसर्गाचा रंग
किमयेने पळसाच्या
सर्व राहताता दंग

झाड झाड होते सुने
जाता गळूनीया पाने
कथा पळसाची न्यारी
गातो वसंताचे गाणे

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

गुलाबाची फुलं

🌹 *गुलाबाची ती फुलं*🌹

गुलाबाची ती फुलं
निरागस,लोभस,गोंडस
काट्यामधी फुललेली
वाऱ्यावर डोललेली
रोज डे काय आला अन्...
खुडली गेली देटातून
कोणी देवापुढं मांडली
कोणाच्या वेणीत विराजली
कोणाच्या ओंजळीत आली
कोणाच्या चिमटीत बसून
गंधाने ह्रुदयाला सुगंधमय केलं
कोणी पाकळ्यात कुस्करून
शयनघरातील पलंगावर अंथरलं
काही फुलांच्या नशीबात मात्र...
पायदळी तुडवणं आलं..नकार पचवायला
काहींना कचरापेटीत तर....
तर काहींना रस्त्यावर भिरकावलं..
काही फुलं मात्र प्रियेशीच्या प्रतिक्षेत हातात तशीच सुकून गेली.......😢🌹
✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
© *ldsawant.blogspot.in*

पतंग व्हायचयं मला

खुडताना कळी

*खुडताना कळी तुला*

काढले पोट्याने घराबाहेर जेव्हा
आसवे तुझ्या होते नयनी दाटले
खुडताना पोटात कळी इवलीशी
तुला का तेव्हा ना काहीच वाटले

  खेळली असती ती अंगणात
  घर केले असते तुझ्या मनात
  धरला तू हव्यास दिवट्याचा
  तेव्हाच तुझे रे नशीब फुटले

  बेभान होतास तारूण्यात तू
  घेतले ना तेव्हा रे ध्यानात तू
लेक लावी दिवा दोन्ही घराचा
  बोल हे तुला ना कधी पटले

चिरडून कळीला जन्म मुलाचा
प्रश्न तेव्हा होता तुझ्या कुळाचा
कळले ना तुला भविष्य उद्याचे
म्हणूनच आज आभाळ फाटले

जिम्मेदार तू तुझ्या यातनांचा
गुन्हेगार तू  तुझ्या आसवांचा
नको आता रे कोरडा उसासा
कर्माने तुझ्या अंधाराला गाठले

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

आली खळ्याला जाग

*आली खळ्याला रे जाग*

आली सोंगणीला आली
साऱ्या शेतातली साळी
गावोगावी  मळणीला
सज्ज झाल्यात रे खळी

धुमाकूळ जागोजागी
माह संपताना माघ
रास साळीची अंगणी
येते खळ्याला रे जाग

होता घावावर घाव
दाणे निसटती खाली
उफनाया वाऱ्यावर
पुन्हा भरतील डाली

किती कष्टाचे हे काम
अंग गाळतेय घाम
तरी मातीमोल ठरे
साऱ्या घामाचा रे दाम

जरी पडतात कष्ट
तरी राबे शेतकरी
आबादानी उत्पन्नाचे
स्वप्न बाळगून उरी

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

नकोच ती वादळे

🌪 *नकोच ती वादळे*🌪

खूप झाली वादळे
खूप झाली रे हवा
शांती नि समतेचा
मार्ग दाखवा रे नवा

किती आली वादळे
आणि विरून गेली
निरापराध जीवांचा
गळा चिरून गेली

महान होते पुरूष ते
नका जातीमध्ये बांधू
त्यांच्या थोरवीवरती
नका संधी तुम्ही साधू

निळे, भगवे नको
नको हिरवे वादळ
उभाराया शांतीस्तंभ
घेवूया हाती कुदळ

कशाला करता हवा
गर्वाचा नुसता फुगा
हिमतीवर स्वतःच्या
जरा आनंदाने जगा

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

ति पुन्हा

🌹 ती पुन्हा🌹

निळसर वसने नेसूनीया
मजसमोर ती प्रगटली
आनंदाचे नभ दाटले नी
लकेर हास्याची उमटली

वादळ मग विचारांचे
या ह्रुदयात घोंगावले
डोळा साठवायचे तिला
स्वप्न मनात जागवले

चंद्राची ती कोर तिने
होती लावलेली भाळी
केसामधी माळलेली
तिने गुलाबाची कळी

धकधक या काळजात
शब्द गारठूनी गेले
मूक होतो दोघे तरीही
खेळ नयनांनी केले

वादळागत आली अन्
तशीच ती निघून गेली
आठवणींच्या जखमांना
पुन्हा  कुस्करून गेली

✍🏻 लक्ष्मण दशरथ सावंत
© ldsawant.blogspot.in

जगण्याचा चंग

जगण्याचा चंग

तीन लाकडे रोवून
छान झोपडी बांधली
तीन दगडांची चूल
माय तिच्यात रांधली

ऊन तापवीते माथा
कापी पाचरट अंग
पोटासाठी खपायचा
तरी बांधलेला चंग

तान्हं ठेवून कोपीत
गेली बांधायला मोळी
आईविना लेकराची
कोण हालवेल झोळी?

होता कोयत्याचा घाव
ऊस हातामधी येई
मोळी बांधून ऊसाची
सखी डोईवर नेई

ईतभर पोटासाठी
राबताना उन्हामंधी
क्षणभर विसाव्याची
नाही मिळतच संधी

✍🏻 लक्ष्मण दशरथ सावंत
जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद
© ldsawant.blogspot.in