सकाळ झाली

सकाळ झाली

पुर्वेकडे  क्षितीजात
अशी पसरली लाली
कोंबड्यानं बाग दिली
झाली सकाळ झाली

उगवला  रविराज
दाटी किरणांची झाली
लगबग पाखरांची
झाली सकाळ झाली

दंवबिंदू चहूकडे
तृणपाती झाली ओली
झाडं-वेली आनंदली
झाली सकाळ झाली

गेला मिटून काळोख
पेटू  लागल्यात चुली
पेटवण्या क्रांतीज्योत
झाली सकाळ झाली

✍🏻 लक्ष्मण दशरथ सावंत
जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद
© ldsawant.blogspot.in

थेंब

थेंब

थेंब भेटले मातीला
थेंब पडले रानात
थेंब पडले झाडात
थेंब वाजले पानात

थेंब आले हळूवार
थेंब लागे गारगार
थेंब धार तलवार
थेंब स्पर्श अलवार

थेंब सुखवी तनाला
थेंब सुखवी मनाला
थेंब स्पर्शतो तनाला
थेंब हर्षीतो मनाला

थेंब हसवी मुलांना
थेंब खुलवी मुलांना
थेंब भिजवी फुलांना
थेंब फुलवी फुलांना

थेंब दुःखात सोबती
थेंब आनंदाचा साथी
थेंब  -हुदयाचं  हसू
थेंब डोळ्यातील आसू

✍🏻 लक्ष्मण दशरथ सावंत
जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद
© ldsawant.blogspot.in

पावसा

पावसा

अरे पावसा पावसा
कुठं दडून बसला
जीव पणाला लागला
कुठं अडून बसला

अरे पावसा पावसा
नको  नुसतेच  ढग
करपलं  धान  सारं
खाली येऊनीया बघ

अरे पावसा पावसा
नको होऊस निर्दयी
भिजवाया रान सारं
फोड पाझर -हुदयी

अरे  पावसा  पावसा
काय आहे तुझ्या मनी?
गेला सुकूनीया घसा
किती करू विनवणी

अरे पावसा पावसा
कुठं मारलीस दडी
सुखी संसाराची माझ्या
गेली विस्कटुन घडी

✍🏻 लक्ष्मण दशरथ सावंत
जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद
© ldsawnt.blogspot.in

करा विचार लांबचा

करा विचार लांबचा

तुम्ही  मारा  पाटीवर
नका पोटामधी मारू
नाही देता आला चारा
नका हो प्लास्टिक चारू

उभं आयुष्य शेतात
सारं झिजलय माझं
खाणं माझं कसं मग
तुम्हा वाटले हो ओझं?

जिथं तिथं प्लास्टिकचा
खच  पडलेला  आहे
मानवाचा  विचारच
इथं  सडलेला  आहे

फळं तुमच्या कर्माची
आम्ही भोगीत बसतो
जरी   तेहतीस  कोट
देव   देहात   वसतो

असं प्लास्टिकच खाणं
नाही  पोटाला  पचलं
जगण्याचं   बळ माझं
पूर्ण   तिथच   खचलं

छंद  होतोय  तुमचा
जीव जातोय आमचा
नका पाहू पायाजोगं
करा  विचार लांबचा

✍🏻 लक्ष्मण दशरथ सावंत
जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद
© ldsawant.blogspot.in

कोशिंबीर

कांदा आणि टॕमोटोचे
घनघोर युद्ध झाले
चाकू विळी त्यांना मग
लढायला कामी आले

कोंथींबिर सुद्धा तिथं
आली धावत पळत
घाव तिलाही विळीचा
झाला कि हो नकळत

युद्ध  सोडवताना ती
झाली काकडी शहीद
पातेल्याच्या तुरूंगात
थोडे दही झाले कैद

मिठानेही भांडणाला
थोडीफार हवा दिली
युद्धातच पातेल्यात
कोशिंबीर रेडी झाली

स्वाद  असा  शानदार
आले तोंडालाही पाणी
घेतो खाऊन आता मी
गेली  संपून  कहाणी

✍🏻 लक्ष्मण दशरथ सावंत
जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद
© ldsawant.blogspot.in

निसर्ग सौंदर्य

निसर्ग सौंदर्य

निसर्गाने सौंदर्यांची
अशी उधळण केली
जागोजागी रानफुले
मस्त बहरून आली

रान  गवताचं  पातं
वाऱ्यावर डोलतयं
गाणी फुलपाखरांची
कानो-कानी बोलतयं

पाणी वाहे खळाळून
नाही जुमानत कोणा
फोडी पाझर डोंगरा
सोडी वाहण्याच्या खूणा

आला बाजरीला आला
बघा कणीस फुलोरा
दिसे प्रत्येक रानात
त्याचा अनोखा डोलारा

खेळ ऊन-पावसाचा
चाले रान-शिवारात
दिसे आनंदी-आनंद
साऱ्या गाई-वासरात

लक्ष्मण दशरथ सावंत
जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद
© ldsawant.blogspot.in

असे आम्ही

*असे आम्ही-१*

मराठवाड्यात दुष्काळ
पाचवीलाच पुजलेला
कोरडा सारा रानमाळ
डोळा आश्रुंनी भिजलेला

महापूराच्या गोष्टी फक्त
आम्ही बातम्यात पाहतो
पावसाला विटाळ आमुचा
वाराही कोरडाच वाहतो

नौकरीच्या शोधार्थ तरूण
मुंबई-पुण्याला धाव घेतो
शेतकऱ्यांच्या कापसाचा
इथं कवडीमोल भाव होतो

फरफट होते संसाराची
आयुष्य रोजंदारीत जाते
खांद्याला लावून ती खांदा
नव-याबरं पाचरटात राबते

उरात दाटलेली दुःखे
उरातच दबली जातात
कर्माला दोष देण्याशिवाय
काहीच नसते हातात

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
*ldsawant.blogspot.in*

प्रवाह

पान-पान झाले ओले
जलमय झाला परिसर
रानोमाळ जलधारांचा
चाललाय मुक्त संचार

काळभोर खडकातून
पाट दुधाचे वाहती
मनमौजी ते शैवाल
नित्य प्रवाहात नाहती

शुभ्र कांतीचा हा प्रवाह
जाई दूरवरती वाहून
कधी ओढा नदीनाला
कधी धबधबा होऊन

सळसळती नागीन
कधी हरणीचे पाय
मन जाईल तिकडे
सैरवैर धावत जाय

खळखळाट येई कानी
पाणी सांगे जीवन रहस्य
नका राहू तुम्ही बंदिस्त 
द्या झुगारूनी सारे दास्य

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

वेळ माझ्यासाठी

*वेळ माझ्यासाठी*

ठेवा   दूर   मोबाईल
मला जवळ घ्या पप्पा
काढा वेळ माझ्यासाठी
मारू गोड गोड गप्पा

खेळे तुमच्या शेजारी
इवलासा माझा जीव
मोबाईलमुळे  तुम्हा
तरी  येत  नाही कीव

सोडा ना हो मोबाईल
एक पापा मला द्या ना
एक फेरी मारायला
मला अंगणात न्या ना

अंगावर  खेळेन  मी
करा हाताचाही झुला
काढा रूसवाही माझा
मज बोलूनीया फुला

मला नकोत खेळणी
फक्त पप्पा मला हवे
बालपण  माझे सारे
त्यांच्या सोबतीने जावे

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

आम्हाला सारे हिंदुस्थानी

आपण सारे हिंदुस्थानी
गाऊ स्वातंत्र्याची गाणी||धृ||

गांधीजींची ही पवित्र भूमी
क्रांतिविरांची इथे ना कमी
हाक मिळता बलीदानाची
पेटूनीया उठते ही अवनी||१||

कोणी फासावरती चढले
कोण घनघोर युद्ध लढले
रक्षणार्थ या मायभूमीच्या
धारातीर्थीही पडले रणी ||२||

जातीभेद ते विसरून जाऊ
एकात्मतेचा हा संदेश देऊ
हात घेऊनीया हातामधी
दुष्मणांना पाजुया पाणी||३||

लोण्याहूनही आम्ही मऊ
सिंहाचेही कधी बछडे होऊ
सत्य अहिंसेची परंपरा अन् 
क्रांतिज्योतही जळते मनी||४||

घाल घाव

*घाल घाव*

नको होऊ मस्तवाल
ऐन तारूण्यात पोरा
मनगटी जोर तुझ्या
तरी नको दावू तोरा

चार दिवसांची आहे
अरे तुझी ही जवानी
बोलताना सावर तू
तुझी ही वाचाळ वाणी

बिडी सिगारेट नको
नको गुटखा नि दारू
सोडूनीया कामधंदा
नको मुलींमागे फिरू

नको करू चोरीमारी
नको होऊ भ्रष्टाचार
दोन पैशासाठी नको
होऊ कधीही लाचार

घाल घाव काढ पाणी
नको लेचापेचा वागू
हरामाच्या  पैशावर
नको  जींदगानी जगू

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

कृष्ण

*कृष्ण*

यशोदेचा नंदलाला
राधिकेचा प्रिय सखा
यमुनेच्या तिरावर
खेळ रंगे हो अनोखा

खेळ चाले विटीदांडू
बालगोपाळांच्या संग
भान  हरवूनी  मिरा
होई  भजनात  दंग

जाती  गोपिका हर्षुनी
जेव्हा वाजवी तो पावा
सुर  मधुर  असा  की
वाटे   ऐकत  राहावा

लोणी चोरूनीया खातो
माठ  दुधाचे   फोडीतो
खोडी काढतो तो अशी
वेणी  राधेची  ओढीतो

केले कालियामर्दन
दृष्ट कंसही मारीला
भाऊ झाला द्रोपदीचा
मार्ग  अर्जुना दाविला

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

वेळ माझ्यासाठी

*वेळ माझ्यासाठी*

ठेवा   दूर   मोबाईल
मला जवळ घ्या पप्पा
काढा वेळ माझ्यासाठी
मारू गोड गोड गप्पा

खेळे तुमच्या शेजारी
इवलासा माझा जीव
मोबाईलमुळे  तुम्हा
तरी  येत  नाही कीव

सोडा ना हो मोबाईल
एक पापा मला द्या ना
एक फेरी मारायला
मला अंगणात न्या ना

अंगावर  खेळेन  मी
करा हाताचाही झुला
काढा रूसवाही माझा
मज बोलूनीया फुला

मला नकोत खेळणी
फक्त पप्पा मला हवे
बालपण  माझे सारे
त्यांच्या सोबतीने जावे

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

आई

*कविता- आई*

माझ्या जीवाची तुझ्याच पोटी नाळ राहू दे
प्रत्येक जन्मी तुझाच मजला बाळ होऊ दे

असताना आई माझी मग कशाची भीती
कोणतेही वादळ, संकटे वा काळ येऊ दे

राबतेस दिनरात नित्य आमच्यासाठी आई
यातनांच्या डोंगराचा आता  जाळ होऊ दे

तू पांडूरंगाच्या रूक्माईसम सदैव मायाळू
त्या मंगल किर्तनातील मला टाळ होऊ दे

एक विनंती देवा तुला ठेव सुखात माझी आई
वाहूनिया तिचे सारेच दुःख, आबाळ जाऊ दे

लक्ष्मण दशरथ सावंत
जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद
मो.नं.-9403682125

रंगी-बेरंगी

*रंगीत चेहरा-बेरंगी जीवन*

बेरंगी  माझे  जीवन
आणी चेहरा रंगलेला
भुकेच्या आर्ततेने तो
आत असे खंगलेला

खेळण्याच्या वयातही
मी दुसऱ्यांना हसवतो
सुखी आहे दर्शवूनी
मी स्वतःलाच फसवतो

जीवन फुटपाथावरचं
जगायचं किती दिवस?
हात पसतर जगापुढे
मागायचं किती दिवस?

ताई थकलोय ग मी फार
पेलवना गळ्यातील हार
हरवली जगण्याची बहार
होतेय  जीवनाची  हार

नको पकडू हात आता
बिनधास्त मला जगू दे
फेकून ही विदुषी वसने
माणूस म्हणून वागू दे

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

अरे शिक्षण शिक्षण

आहो शिक्षण शिक्षण
गेलं  बदलून  पार
मिळे गणवेश जोडी
पोटा पोषण आहार

आहो शिक्षण शिक्षण
नाही शारीरिक शिक्षा
तिथं मानवी मूल्यांची
होते  काटेकोर  रक्षा

आहो शिक्षण शिक्षण
आहे गंमतच न्यारी
शैक्षणिक साधनांची
भरे शैक्षणिक वारी

आहो शिक्षण शिक्षण
गेली  बदलून  शाळा
डिजीटल शिक्षणाने
लागे विद्यार्थ्यांना लळा

आहो शिक्षण शिक्षण
फक्त झेडपीची शाळा
चारी  दिशेला  फुलतो
ज्ञान  अमृताचा  मळा

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

पाझर

*पाझर*

गेला  संपून  खरीप
तरी  बरसला  नाही
कसा लोपला वरूण
कुठं  दिसतही नाही

हाता तोंडाशी आलेलं
गेलं   पीक  करपुनी 
नाय   पाहावत  शेत
गेलं    भान   हरपुनी

कष्ट झालं मातीमोल
जीव लागेना कशात
माती होताना पिकांची
घास जाईना घशात

बीज   पेरलं  शेतात
कर्ज  बँकेचे  काढून
नाही  पाझर ढगाला
काय   ठेवलं  वाढून

आस डोळ्यांना लागली
बरसेल  आज  उद्या
मग   दुथडी  भरूनी
सुखी  वाहतील  नद्या

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

नवीन पहाट

*नवीन पहाट*

सण पुनवेचा आला
धागा राखीचा घेवून
कर हात माझ्या पुढे
आली बहीण धावून

तुला ओवाळू मी कशी
नाही आरतीचे ताट
दगडाचा घे आसरा
नाही बसायला पाट

बाप फोडीतो दगड
माय बनविती रस्ता
मोबादला त्या घामाचा
आहे हो खूपच सस्ता

गडेगंज इमारती 
काय लोकांच्या कामाच्या
खाऊ मिरची भाकर
धारा गाळून घामाच्या

दुःख दारिद्रय जन्माचं
किती  बसावे  रडत
नशीबाला कोसोनिया
दुःखी खपल्या काडत

जरी उघडा संसार
जगू आनंदी जीवन
आज जरी अंधकार
उद्या पहाट नवीन

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

मृत्यू हेच सत्य

*मृत्यू हेच सत्य*

बोल्ट असो वा कोणीही
शेवटी शरणागती आहे
कितीही मडवा सोन्याने
शेवटी देहाची माती आहे

हात उगारायला नाही
हात जोडायला शिका
पणतीवाणी जळूनीया
सगळ्यांची मने जिंका

कपड्याची खरी किंमत
सरणावरती कळते
काटाही न टोचलेलं अंग
तिथं धडा धडा जळते

वर्ष किती लोटलेस तू
स्वरूप समजून घ्यायला
दोन गज जमीन पुरेशी
अनंतात विलीन व्हायला

मी-तू पणा सोड आता
मिळून मिसळून जग
सुर्याला लपवू पाहणारे
चिरकाल नसतात ढग

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

तू लवकर ये

तू लवकर ये

गणपती बाप्पा
तू लवकर ये
सुखाचे आम्हा
तू वरदान दे

मोदकाचा तुला
प्रसाद मी देईन
आनंद माझ्या
या मनाला होईल

गुलाल उधळूयात
आम्ही सारी मुले
आरतीला तुझ्या
जास्वंदीची  फुले

उंदरावर रे देवा
होतोस तू स्वार
दुःखाचे आमुच्या
झेलतोस तू वार

आगमनाची तुझ्या
या नयनाला आस
सुखकर होवो देवा
तुझा हा  प्रवास

लक्ष्मण दशरथ सावंत
जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद
मो.नं-9403682125

जगण्याचा रंग

*जगण्याचा रंग*

एवढीशी ती पोर
ना जीवाला घोर
ठुमकत चालली
तालावर डोलली

कमरेला कळशी
पायामधी पैंजण
भरायाला चालली
किती ती रांजण?

अस्तावेस्त  बाल
तरी ऐटबाज चाल
नजरेमध्ये तिच्या
स्वप्नांचा  महाल

दुष्काळात तिचे
घट्ट आहेत पाय
उन्हाच्या चटक्यांना
जुमानत ती न्हाय

जगण्याचा तिचा
आहे वेगळाच ढंग
आनंदाचा त्यात
तिने मिसळला रंग

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
*मो.नं.-९४०३६८२१२५*

प्रवाह

पान-पान झाले ओले
जलमय झाला परिसर
रानोमाळ जलधारांचा
चाललाय मुक्त संचार

काळभोर खडकातून
पाट दुधाचे वाहती
मनमौजी ते शैवाल
नित्य प्रवाहात नाहती

शुभ्र कांतीचा हा प्रवाह
जाई दूरवरती वाहून
कधी ओढा नदीनाला
कधी धबधबा होऊन

सळसळती नागीन
कधी हरणीचे पाय
मन जाईल तिकडे
सैरवैर धावत जाय

खळखळाट येई कानी
पाणी सांगे जीवन रहस्य
नका राहू तुम्ही बंदिस्त 
द्या झुगारूनी सारे दास्य

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

माहेरवाशीन

*माहेरवासीन*

येते  मनात  दाटून
माहेराची आठवण
धाव घेते माहेराला
मास लागता श्रावण

नागोबाला पुजायचा
नाग पंचमीचा सण
झोक्यावर बसुनिया
झुले उंच माझे मन

सा-या सासरवासिनी
लेकी माहेराला येती
सुख दु:खे ऐकमेकी
-हुदयात त्या ओतती

राखी बांधते भावाला
त्याला करून औक्षण
लाडका तो बंधुराया
गुंते त्याच्यातच मन

असा सोन्याचा श्रावण
येई   एकदा  वर्षात
आईबापाच्या कुशीत
जातो अगदी हर्षात

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

बदलाची नांदी

*बदलाची नांदी*

कात टाकली शाळेने
बदलला गणवेश
डिजीटल शिक्षणाने
अंगी बानविला जोश

गेली बदलून शाळा
बदलले  गुरूजण
काय हवे विद्यार्थ्यांना
त्यांनी जाणलेय मन

अ आ ई गिरवणा-या
हाती आलाय माऊस
सेमी इंग्रजीच्या संगे
घर  झालय  हाऊस

गेली हातातली छडी
झाली भयमुक्त शाळा
तंत्रज्ञानी  शिक्षणाचा
लागे विद्यार्थ्यांना लळा

झाली डिजीटल शाळा
बोलु लागले पुस्तक
नव्या शिक्षणाची नांदी
गेली  देऊन  दस्तक

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

घासभर धान्य

*घासभर धान्य*

सई दळीते दळण
भल्या पहाटे उठून
जातं वाजे घरोघरी
येतं तांबडे  फुटून

घासावरी घास धान्य
टाके जात्याच्या मुखात
होतो तरास पाटीला
तरी  गातेय  सुखात

घासावरी घास धान्य
टाके जात्याच्या मुखात
होतो तरास पाटीला
तरी  गातेय  सुखात

काट पदराची साडी
तिला शोभून दिसते
गाते जात्यावर ओव्या
सई  गालात  हसते

रांधल्याचा जात्यावर
नाही कसलाही त्राण
रात्रंदिस  घरासाठी
तिचे  राबतात  प्राण

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

नको माझ्यावर रूसू

*नको माझ्यावर रूसु*

नको माझ्यावर सखु तू रूसु ग
नको कोपऱ्यात जाऊन बसू ग

सोनुच्या नादी तू नको लागु
त्या RJ वाणी तू नको जगू
उगी खड्डे नको शोधत बसू ग

विदेशात जास्त तू फिरू नको
भाषणबाजी जास्त करू नको
आपल्याच शब्दात नको फसू ग

अच्छे दिनाचे स्वप्न तू पाहू नको
गोड बोलण्यात अशी वाहू नको
बघ टमाटेही लागलेत आता हसू ग

वंशाला हवा दिवा,पणती विजवती
दाभोळकर मारून कर्मकांड माजवती
भविष्य अंधारात लागलय दिसू ग

ती बेटी जरी या भारत भू ची
शिकार ती नित्य वासनांधाची
शुद्ध विचारही लागले नासू ग

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
© *ldsawant.blogspot.in*

घासभर धान्य

*घासभर धान्य*

सई दळीते दळण
भल्या पहाटे उठून
जातं वाजे घरोघरी
येतं तांबडे  फुटून

घासावरी घास धान्य
टाके जात्याच्या मुखात
होतो तरास पाटीला
तरी  गातेय  सुखात

घासावरी घास धान्य
टाके जात्याच्या मुखात
होतो तरास पाटीला
तरी  गातेय  सुखात

काट पदराची साडी
तिला शोभून दिसते
गाते जात्यावर ओव्या
सई  गालात  हसते

रांधल्याचा जात्यावर
नाही कसलाही त्राण
रात्रंदिस  घरासाठी
तिचे  राबतात  प्राण

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

श्रावण

🌧 *श्रावण*🌾

आला श्रावण महिना
शालू  हिरवा नेसून
लेकीबाळी घेती मजा
झोक्या वरती बसून

नागपंचमीचा  सण
आले आनंदा उधान
हंडी दह्याची कृष्णाला
आहे फोडायचा मान

नारळीची ती पौर्णिमा
आणी सागरा भरती
राखी बांधून भावाला
ताई औक्षण करती

ऊन पावसाचा खेळ
चाले राना माळावरी
थोडे सुकताच अंग
चिंब भिजवती सरी

इंद्रधनुष्याचा वेल
दिसे क्षितीजावरती
तृप्त ढेकर देतीया
पाणी पिऊन धरती

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

प्रेमयात्री

🌹🌹 *प्रेमयात्री* 🌹🌹

टाक पावले झपाझप अजूनी चांदरात आहे
तव लावण्य बहारण्याची ही सुरूवात आहे

लपतो का सुर्य कधी काळसर त्या ढगांनी?
तुझ्या यौवनाची चर्चा सखे घराघरात आहे

चाखला मी तो गुलकंद ओठांवर असलेला
माधुर्य त्या ओठातले या ओठास ज्ञात आहे

न बोलताच काही ये या छातीस बिलगाया
तुझी जागा फक्त माझ्या या -हुदयात आहे

सोड बाण नयनांचे कर घायाळ काळजाला
वेदना होतील कशा ते आजही प्रेमात आहे

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
© *ldsawant.blogspot.in*

पटलं तर बोला

*पटल तर बोला*

झिंगलोय जरी आज मी
तरी खरं खरं बोलाणार
खरं बोलल्याबिगर आज
गटारात नाही लोळणार||धृ||😇

दिवसाढवळ्या लेकीबाळी
बलात्काराला बळी पडत्यात
पुरोगामी माझ्या राज्यामध्ये
रोजच अशा घटना घडतात
निर्ढावलेल्या *त्या* हातांना
सांगा कोण आता तोडणार||१||

भ्रष्टाचाराने लोकनेत्यांचे
मावत नाही कंबरेवर पोट
नौकरीविना नवयुवकांचे
चिंतेने सुकून गेलेत ओठ
बेरोजगार अशा हातांना
सांगा कोण काम देणार||२||

शिक्षणव्यवस्थेत आज
ताळमेळ दिसत नाही
पहिल्यासारखा गुरूजी
मनमोकळा हसत नाही
बदलीच्या गुंत्यातून त्याला
कोण सलामत काढणार||३||

नवरी मिळेना तरूणाला
कितीही शहाणे वागून
गर्भपात अजूनही होतो
कायदा खुंटीला टांगून
कळीला खुडणा-या हातांना
कोण जबर शिक्षा करणार||४||

पिलोय जरा जास्तच थोडं
म्हणून पडतायत ही कोडं
चांगली चाललीय जींदगी
कुठं आडतयं  माझं  घोडं
पण कुठवर हे निर्लज्याचे
जीवन आपण  जगणार||५||

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
© *ldsawant.blogspot.in*

पावसाळी रात्र

*पावसाळी रात्र*🌹

रात्रीच्या चिंब पावसात
तू चिंब भिजूनीया यावे
माझ्या छातीवर विसावता
श्वासही चिंब चिंब व्हावे

केस असतील तुझे ओले
अन् थेंबही तव गालावरी
मी ओटांनी टिपू लागता
तू होऊनीया जावी बावरी

गेले विझूनीया सारे दिवे
ही रात पावसात न्हाली
चिंब भिजलेली ती बटा
तुझ्या गालावरती आली

भिजली ती सारी वसने
तिचे तनही भिजून गेले
बिलगता  मजला  तिने
हसू   गालावर  उमलले

तो चंद्र लपला ढगाआड
तरी हा चंद्र हातात आहे
पावसाळी या काळोखात
तिला न्याहाळून मी पाहे

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
© *ldsawant.blogspot.in*

तुझ्या -हुदयात

🌹🌹 *तुझ्या -हुदयात*🌹🌹

तुझ्या -हुदयात माझी जागा राहू दे
प्रेम मालेतील मजला धागा होऊ दे

या जुल्मी पावसाचा भरवसा काय
आज मनसोक्त चिंब उभा न्हाऊ दे

यौवन तुझे सखे सौंदर्यांने भारलेले
डोळ्यांत एकवेळ साठवून पाहू दे

गुलाबी हे ओठ तुझे अमृताची खाण
ओठांनी एकवेळ मज चाखून पाहू  दे

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
© *ldsawant.blogspot.in*

फुगवटा

*फुगवटा*

पावसाचे पाणी
समुद्रात शिरताच
नदीपात्रात दिसून येतो
फुगवटा!

खिरापतीप्रमाणे वाटल्यात 
गुण तोंडी आणि प्रॕक्टिकलचे
गुणपत्रीकेत गुणांचा दिसून आला
फुगवटा!

पावसाळ्यात पावसाने
घराचे दरवाजे होतात जाडे
दरवाजातही आद्रतेचा दिसून येतो
फुगवटा!

हाडांची काडे करून
राबतोय शेतकरी शेतात
भ्रष्टाचाराने नेत्यांच्या पोटाचा
पाहा दिसून येतोय
फुगवटा!

खोटीच तिची करावी
लागतेय नेहमी मला तारीफ
सत्य सांगायला जावं तर
गालावरती दिसून येतो
फुगवटा!

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
© *ldsawant.blogspot.in*

कुठं कुठं

*कुठं.....कुठं*

कुठं  रिमझिम  धारा
कुठं सोसाट्याचा वारा
कुठं  ढगाविना  आहे
नभाचा  कागद  कोरा

कुठं  नद्यांची  दुथडी
कुठं  महापूर  आला
कुठं पाण्याविन जीव
आता कासावीस झाला

कुठं अतिवृष्ठी  झाली
कुठं  गारपीट  झाली
कुठं पाण्याच्या चिंतेने
झाली पापणी  ओली

कुठं  उच्छाद  ढगांचा
कुठं  मातला  वरूण
कुठं नापिकी म्हणोनी
फासी  घेतोय तरूण

कुठं  असं  कुठं  तसं
खेळ निसर्गाचा असा
कुठं  सतृप्त  ढेकर
कुठं कोरडा उसासा

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

आयुष्याचं ओझं

*आयुष्याचं ओझं*

डोक्यावर माझ्या हाय
उखळीचा  वरवटा
कडेवर  घेतला  मी
माझ्या लाडाचा ग पोट्टा

नजरेत माझ्या काय
दोन वेळचं जेवण
त्याच्यासाठी पायपीट
घेते अंगावर उन्हं

तडूपाचा बांधुनीया
झोका माझीया उराशी
घेते पान्हाही पाजूनी
वेळ काढूनी जराशी

असं  भटकत  जीणं
आलं माझीया नशीबी
मुलं ठेवीन सुखात
माझी राहीन कशीबी

तोल  सावरत  गेलं
सारं आयुष्यच माझं
कधी उतरणारं हे
माझ्या डोईचं ग ओझं?

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

पहाट

🌹 *पहाट* 🌹

सुटला पहाट वारा
मंद झाल्या तारका
बहरला मोगरा अन्
सुगंध येतो सारखा

पुर्वेकडच्या वेशीवर
सांडला कोणी तांबडा
केव्हापासून ओरडतो
क्वॉकक क्वॉक कोंबडा

गवतावर त्या दंवबिंदूनी
साम्राज्य मांडून ठेवलं
अनवाणी पायाला मग
नकळत त्यानं भिजवलं

नवी घेण्या झेप पुन्हा
घरट्यात किलबिलाट
चालू लागेल आज पुन्हा
झोपलेली ती पायवाट

मांगल्याचा सुगंध पुन्हा
दरवळू पाहे घरात
शेणमातीचा सडा अन्
रांगोळी शोभे दारात

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*